Will Dhananjay Munde resign? : राजकीय वर्तुळात मोठी चर्चा असलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट उत्तर दिले आहे. एका पत्रकार परिषदेत माध्यमांनी त्यांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता, अजित पवार म्हणाले की, “जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. मुख्यमंत्र्यांना याबाबत स्पष्टपणे सांगितले आहे आणि ते त्यानुसार योग्य ती कारवाई करत आहेत. सत्ताधारी असो, विरोधी असो किंवा इतर कोणी असो, दोषींना थारा मिळणार नाही. आम्ही सर्वांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे.”
शेतकऱ्यांकडून हार्वोस्टरसाठी पैसे घेतल्याचा आरोप वाल्मिक कराड यांच्यावर करण्यात आला आहे. यावरही अजित पवार यांनी कठोर भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, “या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. दोषींना कधीही माफ केले जाणार नाही. कुणीही लाच घेतल्याचे पुरावे असतील तर ते सादर करा, आम्ही दोषींवर कारवाई करू. कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही.” संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
चौकशी प्रक्रिया पोलीस यंत्रणा, सीआयडी आणि एसआयटीमार्फत सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन चौकशी करण्याचाही शब्द दिला आहे. चौकशीत कोणीही दोषी आढळल्यास त्यांना कोणताही पाठींबा दिला जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे.”
बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चांगल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. “पोलिस अधीक्षकांना कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता योग्य ती कारवाई करण्याची मुभा दिली आहे. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न मार्गी लागेल,” असे त्यांनी सांगितले. अजित पवार यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले की, शासन कोणालाही पाठिशी घालणार नाही. सत्तेत असलेल्या किंवा विरोधकांमध्ये असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही. “आम्ही सर्वांनी एकत्रितपणे ठरवले आहे की, जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. कोणत्याही स्तरावर लाचलुचपत किंवा अन्याय सहन केला जाणार नाही,” असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयीन चौकशीचा शब्द दिला असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले. “मुख्यमंत्री प्रामाणिकपणे काम करत असून, त्यांनी कोणत्याही प्रकरणात निष्पक्ष चौकशीचे आदेश दिले आहेत. सर्व चौकशा पारदर्शक पद्धतीने होत असून, दोषींना शिक्षा होणार आहे,” असे ते म्हणाले.