मालवणीतील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात वातावरण तापल्याचा पाहायला मिळत आहे. तर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीकेची जोड होत आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वादग्रस्त वक्तव्य करत याप्रकरणी आगीत तेल ओतण्याचे काम केलं आहे. या वादकग्रस्त वक्तव्याचा समाचार विरोधी पक्षाचे नेते घेताना दिसत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हा वाऱ्यामुळे कोसळला असल्याचा विधान केलं होतं. या विधानानंतर राज्यभरात वातावरण आणखी तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नसल्याचं विरोधकांनी म्हणत महाविकास आघाडी च्या वतीने मुंबईमध्ये सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले आहे.
या आंदोलना दरम्यान राज्य सरकारला धारेवर धरत मालवण मध्ये उभारलेला पुतळा हा भ्रष्टाचाराचा नमुना असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केला आहे. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याकारणाने हा पुतळा कोसळल्याच देखील म्हटलं जात आहे. देशभरात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हे गेल्या अनेक वर्षापासून उभारण्यात आलेले आहेत. परंतु अशा प्रकारची घटना घडणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असल्याचे देखील बोलले जात आहे. महाराजांबरोबरच हा शिवप्रेमींचा ही अपमान असल्याचं म्हणत शरद पवार यांनी या घटनेचा व राज्य सरकारचा निषेध केला आहे.
तर मोदींनी माफी कशासाठी मागितली महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली की पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली ती भ्रष्टाचारांवर पांघरून घालण्याकरता मागितली असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. घाई घाईने भ्रष्टाचार करून पुतळा बसवण्याची गरज नव्हती, हे सांगतानाच निवडणुकीच्या वेळी मोदी म्हणत होते की मोदी की गॅरंटी हीच ती मोदीची गॅरंटी हात लावीन तिथे माती होईल असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह राज्य सरकारवर टीका केली.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण कृती पुतळा कोसळल्यानंतर अशा प्रकारे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत. तर महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईमध्ये सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करत ज्या प्रकारे निषेध नोंदवण्यात आला याची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. या आंदोलनामध्ये शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शिवप्रेमी सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. यावेळी राज्य सरकार सह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील समाचार घेण्यात आला.