गेल्या पाच महिन्यांपूर्वी घोषित केल्यानुसार मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र म्हणून मान्यता असणाऱ्या ऐतिहासिक व अभेद्य सिंधुदुर्गावर सोमवारी यंदाचा नौदल दिन भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत. एतद्देशीय तत्कालीन राजांमध्ये सर्वांत अगोदर आरमाराचे महत्त्व ओळखून छत्रपती शिवाजी महाराज यांनी भारतीय नौदलाचा पाया घातला. आता आपल्याला चीनच्या जगातील सर्वात बलाढ्य नौदलाशी स्पर्धा करायची आहे. सिंधुदुर्गात होणाऱ्या या नौदल दिनाचे महत्त्व त्यामुळे आगळेवेगळे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आरमार व सागरी सुरक्षेला प्राधान्य दिले होते. व्यापारी, चाचे आणि ब्रिटिशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सागरी गडांची गरज असल्याचे शिवरायांनी जाणले आणि त्यातूनच अभेद्य असा सिंधुदुर्ग बांधला. नौदल दिनानिमित्त हिंदुस्थानी नौदलाच्या सामर्थ्याचे शक्तिप्रदर्शन सिंधुदुर्गाच्या समुद्रात होणार आहे. पाकिस्तानविरुद्ध १९७१मध्ये झालेल्या युद्धादरम्यान भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर जोरदार हल्ला करून पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले होते. त्यानिमित्त दरवर्षी चार डिसेंबर हा दिवस भारतीय नौदलातर्फे विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतावर त्या वेळी आक्रमण करायला निघालेल्या अमेरिका आणि ब्रिटनच्या आरमाराला परत जावे लागले होते.
त्याचे कारण रशियन पाणबुड्या भारताच्या मदतीला आल्या होत्या. आता भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया अशा देशांना भारताच्या नोदलाच्या संयुक्त मोहिमा चालू असतात, तरीही जगातील सर्वांत शक्तीशाली नौदल चीनचे आहे. आपण विशाखाट्टणम तसेच अंदमान-निकोबारवर नौदलाची अत्याधुनिक केंद्र स्थापन केली आहेत; परंतु चीन ग्वादर हंबनटोटा तसेच म्यानमार आणि मालदीवमधील बंदरांवरून भारताच्या सागरी हालचालीवर पाळत ठेवतो आहे. अशा परिस्थितीत आपले नौदल अधिक सामर्थ्यशाली असायला हवे. सरकार त्यादृष्टीने प्रयत्न करतेच आहे. शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने ब्रिटिश, पोर्तुगीज आणि डच आरमारांना शह दिला, त्या पद्धतीने आपल्यालाही आता व्यूहरचना करावी लागेल.
सिंधुदुर्गातील नौदल दिनानिमित्ताने ७० लढाऊ जहाजे सहभागी होणार आहेत. यंदाच्या नौसेना दिनानिमित्त भारतीय नौसेनेच्या सामर्थ्याचे मोठे शक्तिप्रदर्शन सिंधुदुर्गच्या समुद्रात होणार आहे. जगात चौथ्या क्रमांकाची बलाढ्य नौसेना म्हणून भारतीय नौसेनेला जगात ओळखले जाते. १९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान भारतीय नौसेनेने पाकिस्तानच्या कराची बंदरावर जो वज्राघात केला होता, त्यामुळे पाकिस्तानला सपशेल शरणागती पत्करावी लागली होती. या वज्राघाताने भारतीय नौसेनेची खरी ताकद साऱ्या जगाला कळून चुकली आणि त्यामुळेच दरवर्षी ४ डिसेंबर हा दिवस भारतीय नौसेना विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक असे म्हटले जाते. समुद्रावर ज्याचे वर्चस्व त्याचे जगावर वर्चस्व हे सूत्र शिवरायांनी सर्वप्रथम ओळखले होते. ब्रिटिश व्यापाऱ्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सागरी किल्ल्यांची गरज असल्याचे शिवरायांनी जाणले आणि अनेक जलदुर्गांची निर्मिती केली.
त्यामध्ये सिंधुदुर्ग हा किल्ल्याचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. डोंगरी किल्यांच्या बरोबरीने अरबी समुद्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जलदुर्गांचे महत्त्व आहे हे सर्वप्रथम शिवाजी महाराजांनी ओळखले. त्यानंतर त्यांनी सागरी किल्ल्यांची निर्मिती सुरू केली. स्वराज्यातील एक महत्त्वाचा सागरी किल्ला असलेला सिंधुदुर्ग हा त्यापैकीच एक. या किल्ल्याच्या निर्मितीसाठी शिवरायांनी मालवण जवळील कुरटे नावाचे काळा कभिन्न खडक असलेले बेट निवडले. २५ नोव्हेंबर १६६४ रोजी शिवरायांनी सिंधुदुर्ग किल्याची पायाभरणी केली. शिवरायांच्या हस्ते ही पायाभरणी करण्यात आली. या किल्ल्याच्या पायाभरणीसाठी ५०० खंडी शिशाचा वापर करण्यात आल्याचे सांगितले जाते. पोर्तुगीज, इंग्रज व सिद्दी या आक्रमकांपासून वाचवायचे असेल तर स्वतःचे आरमार हवे हे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या वेळीच ओळखले होते. तथापि भारतातील पौर्वात्य राज्यकर्त्यांची नौकानयनाची परंपरा जास्त करून शांततापूर्ण, व्यापारी स्वरूपाची होती.
शिवाय इंग्रज, डच, पोर्तुगीज किंवा सिद्दी यांच्याकडून आरमार उभे करण्याची महत्त्वाची विद्या शिवाजी महाराजांना मिळणे अशक्य होते. ज्याच्याजवळ आरमार, त्याचा समुद्र ! आरमाराची आवश्यकता सांगताना शिवाजी महाराजांनी हे आग्रहपूर्वक सांगितले. निजामशाही, कोकण ताब्यात आल्यावर लवकरच शिवाजी महाराजांनी कल्याण, भिवंडी व पेण येथे युद्धनौका बांधण्याचे काम हाती घेतले. ते कळल्यावर पोर्तुगीजांचे सल्लागार मंडळ म्हणते, “शिवाजी बलाढ्य असल्याने, तसेच कल्याण भिवंडीचा व त्या परिसरातील सर्व कोकणचा मालक असल्याने ते आमचे बरेच नुकसान करू शकतात. त्याच्याशी मैत्री टिकवणे आवश्यक आहे.” या पत्रावरून शिवाजी महाराजांचा परकीयांवर किती वचक होता, हे लक्षात येते.
शिवाजी महाराजांना सागरी सामर्थ्याचे महत्त्व ठाऊक होते, म्हणूनच त्यांनी आरमार निर्माण केले; पण जमिनीवरील शत्रूंना तोंड देत राज्यविस्तार करण्यासाठी वाढत्या संख्येने भूसेना, विशेषतः घोडदळ बाळगणे आवश्यक होते, ते करून शिवाय सिद्दीच्या आरमाराचा कायमचा नाश करू शकेल एवढे प्रबळ आरमार लगेच निर्माण करण्याएवढे आर्थिक सामर्थ्य त्यांच्याकडे नव्हते. मग सुरतेची लूट व आदिलशाही मुलखात लूट करून शिवाजी महाराजांनी आरमार उभे करण्यासाठी आर्थिक बळ उभे केले. जहाजबांधणी, जहाजांसाठी सुरक्षित बंदरे, जहाज दुरुस्तीची तरतूद व या जहाजांसाठी लागणारे शिक्षित आरमारी सैनिक तयार करणे ही सर्व कामे त्यांनी चालूच ठेवली. इंग्रजांनी २६ नोव्हेंबर १६६४ रोजी पाठवलेल्या पत्रात कंपनीला कळवले, की शिवाजी विजयी व अनिर्बंध असून त्यांचे सामर्थ्य रोज वाढत आहे. सभोवतीच्या राजांना त्याची मोठी दहशत वाटते.
त्यांनी आता ऐंशी जहाजे सुसज्ज करून भटकळकडे पाठवली आहेत.’ यावरून लक्षात येते, की शिवाजी महाराजांच्या वाढत्या आरमारी बळाचा इंग्रजांनी चांगलाच धसका घेतला होता. एप्रिल – मे १६७५ मध्ये शिवाजी महाराजांनी फोंडा किल्ला जिंकल्यामुळे त्यांच्या ताब्यातील किनारपट्टीत वाढ झाली. मग आदिलशाहीला पश्चिमेकडे किनारपट्टीच उरली नाही. म्हणजे आदिलशहाचा मुलूख तर गेलाच आणि शिवाय अरबी समुद्रातून होणारा व्यापार शिवाजी महाराजांच्या हाती आला. ही गोष्ट महाराजांच्या वाढत्या नाविक सामर्थ्याला पोषक ठरली. जेतापूरहून मुंबईस पाठवलेल्या इंग्रजांच्या एका पत्रात असा उल्लेख आहे, की शिवाजीकरिता युद्धनौका बांधण्याचे काम चालू असल्याने त्यांचे नोकर सापडतील ते सुतार, लाकडूकापे व लोहार यांना त्याच कामात जुंपत आहेत व त्यामुळे आपल्या कामासाठी कामगार मिळणे आणि त्याहीपेक्षा ते टिकवून ठेवणे कठीण होऊन बसले आहे. शिवाजी महाराजांच्या आरमार बांधणीच्या तयारीवर कंपनी सरकारचे बारीक लक्ष होते. शिवाजी महाराजांनी शून्यातून आपले आरमार निर्माण केले. पोर्तुगीजांचा व सिद्दीचा विरोध असताना हे काम करायचे होते.
हा सर्व उद्योग मोगलांना व आदिलशाहीला तोंड देत असताना, जमिनीवरील युद्धाच्या सर्व गरजा भागवून करायचा होता. असे असूनही या सर्व अडचणींमधून मार्ग काढून शिवाजी महाराजांनी आपले आरमार निर्माण केले. एवढेच नव्हे, तर बसरूरच्या स्वारीत त्यांनी स्वतः त्या आरमाराचे नेतृत्व केले! समुद्राचा अजिबात अनुभव नसलेल्या मराठी माणसांनी इंग्रजांसारख्या कुशल दर्यावर्दी लोकांच्या विरोधाला न जुमानता खांदेरीच्या किल्ल्याचे काम तडीस नेले. सोळाव्या शतकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात घुसू पाहणाऱ्या सर्व युरोपियनांवर मात केली, तरीही पुढील शंभर वर्षे मराठा राज्याच्या वाढीमुळे पश्चिम किनाऱ्यावर ब्रिटिशांना फारशी प्रगती करता आली नाही. याचे कारण होते शिवाजी महाराजांनी उभारलेले आरमार !
भारताच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही एतद्देशीय सत्तेने इंग्रजांशी नाविक युद्ध केले नव्हते आणि त्यानंतरही मराठ्यांखेरीज या देशातील इतर कोणत्याही सत्तेने ते केले नाही. त्यात सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्व आणखी वेगळेच आहे. एकाचवेळी तीन शत्रूंवर लक्ष ठेवून त्यांच्यांशी लढण्यासाठी हा किल्ला बांधला. त्यावर एक कोटी होन खर्ची पडले. या किल्ल्याच्या उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला किल्ला अशी ओळख असलेला सिंधुदुर्ग जवळपास साडेतीनशे वर्षे समुद्राच्या लाटा झेलत उभा आहे. या किल्ल्याचे क्षेत्र सुमारे ४८ एकर आहे आणि त्यांचा तट दोन मैल इतका आहे. या तटाची उंची ३० फूट तर रुंदी १२ फूट आहे. या किल्ल्याच्या तटास ठिकठिकाणी भक्कम असे २२ बुरुज आहेत. सिंधुदुर्ग या किल्ल्यावर शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या पायाचे ठसे उमटलेले आहेत.
या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. नौदल दिनासाठी नौदलाच्या पश्चिम कमांडच्या युद्धनौकांचा ताफा मालवणकडे रवाना झाला आहे. नौदल दिनाच्या कार्यक्रमात प्रामुख्याने आयएनएस कोलकाता, आयएनएस तलवार, आयएनएस ब्रह्मपुत्र क्लासच्या जवळपास आठ मोठ्या युद्धनौका, तर १० ते १२ छोट्या युद्ध नौका तारकर्लीच्या समुद्रात दाखल होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे आयएनएस विक्रमादित्य ही विमानवाहू युद्धनौकासुद्धा या ताफ्यात सहभागी होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. तारकर्ली समुद्रात नौदलाच्या संचलनात चार विनाशिका, चार फ्री – गेट्स, सहा कॉवेंट्स व क्षेपणास्त्र वाहू नौका, आठ जलद हल्ल्याच्या युद्धनौका सहभागी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ध्रुव हे अॅडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर, चेतक, सी किंग हे हेलिकॉप्टर आणि तेजस, डॉर्निअर, मिग २९ के आदी एअरक्राफ्ट आपल्या कसरती दाखविणार आहेत. नौदलाचे मरीन कमांडो पॅराशूटमधून खाली उतरत समुद्रात विविध कसरती करताना पाहावयास मिळणार आहेत.
युद्धनौकांवरून होणारे हल्ले, शत्रूच्या हल्ल्याचा सामना करणे, समुद्री चाच्यांवर कमांडो हल्ला करणे, समुद्री बचाव, हेलिकॉप्टर कसरती अशी विविध प्रात्यक्षिके ४ डिसेंबरला सायंकाळी तारकर्ली समुद्रात पाहावयास मिळणार आहेत. त्याआधी या कार्यक्रमाची रंगीत तालीम सुरू आहे. बहुतांश युद्धनौका मुंबईतील तळावरून जातील तर काही युद्धनौका कारवार येथील विमानवाहू युद्धनौकेच्या ताफ्यातील असतील. अतिमहनीय व्यक्तींसाठी उभारला जाणाऱ्या शामियान्याच्या सुरक्षिततेसाठी समुद्रात सुमारे १३० मीटर लांबीचा जिओ ट्यूबचा बंधारा बांधण्याचे काम चालू आहे. यामध्ये १० मीटर लांबीच्या १३ जिओ ट्यूब वापरण्यात आल्या आहेत. या जिओ ट्यूबच्या बंधाऱ्यामुळे समुद्राच्या लाटांपासून मुख्य शामियान्याचे संरक्षण होणार आहे. असे असले, तरी विमानवाहू युद्धनौकांची तसंच पाणबुड्या व अन्य साधनसामुग्रीची कमतरता आहे. ती भरून काढाली लागेल..