Aghori Sect : अघोरी संप्रदाय हा हिंदू धर्मातील एक असा पंथ आहे ज्याविषयी अनेक समज-गैरसमज पसरले आहेत. स्मशानात राहणं, जळणाऱ्या मृतदेहांसमोर बसणं, अघोरी साधूंचं वेगळं वर्तन आणि त्यांच्या अध्यात्माचा अनोखा मार्ग यामुळे सामान्य समाजात त्यांच्याबद्दल काहीशी भीती आणि गूढ आकर्षण निर्माण झालं आहे.
अघोरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान
अघोरी संप्रदायाचं मूलभूत तत्त्वज्ञान घृणा, वर्ज्यता आणि नैतिकतेच्या परंपरागत चौकटीच्या पलीकडे जाण्याचं आहे. अघोरी मानतात की, प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचा अंश आहे आणि कोणतीही वस्तू वाईट किंवा वर्ज्य नाही. त्यांची साधना स्वतःच्या आत दडलेल्या भयाचा सामना करण्यासाठी असते. मृतदेह, मानवी कवटी किंवा समाजाने तुच्छ मानलेल्या वस्तूंचा ते वापर करतात, यामागे त्यांचा विश्वास असा आहे की, त्या माध्यमातून ते उच्च आध्यात्मिक स्तर गाठू शकतात.
अघोरी साधूंचं जीवन
अघोरी साधू स्मशानभूमीत राहणं पसंत करतात कारण मृत्यूला ते नश्वरेपणाचं प्रतीक मानतात. अघोरींचा विश्वास आहे की, मृत्यू हा जीवनाचा शेवट नसून एक नवीन प्रवासाची सुरुवात आहे. म्हणूनच ते स्मशानभूमीला साधनेचं पवित्र ठिकाण मानतात. अघोरी निर्वस्त्र राहतात किंवा कधीकधी राखेने स्वतःचं शरीर झाकून घेतात. त्यांचं भोजन साधारणपणे खूप साधं असतं, मात्र काही अघोरींना मानवी मांस खाल्ल्याचं सांगितलं जातं. तथापि, ही कृती त्यांच्यासाठी भोग नसून त्यागाचा आणि मनावर नियंत्रण ठेवण्याचा भाग असतो.
अघोरी संप्रदायाचा इतिहास
अघोरी पंथाचा उगम 18व्या शतकात मानला जातो. हा पंथ प्राचीन कपालिक परंपरेशी संबंधित असल्याचं मानलं जातं. कपालिक पंथात मानवी कवटींचा उपयोग, नरबळी देणं यांसारख्या रूढी प्रचलित होत्या. कपालिक परंपरेचा प्रभाव अघोरी संप्रदायावर दिसून येतो, पण अघोरी पंथाने या रूढींना वेगळ्या प्रकारे स्वीकारलं आहे.
Aghori Sect अघोरी आणि महादेव
अघोरी साधू महादेवाचे उपासक आहेत. महादेवांना मृत्यूचा स्वामी मानलं जातं आणि अघोरींना त्यांच्याशी तादात्म्य साधण्याची इच्छा असते. शिवाय, महादेवाच्या पत्नी शक्तीचीही अघोरी पूजाअर्चा करतात. उत्तर भारतात काही महिला अघोरी संप्रदायामध्ये सामील होतात, मात्र त्यांना कपडे घालण्याचं बंधन पाळावं लागतं.
Aghori Sect अघोरींचं योगदान आणि समाजसेवा
अघोरींना सामान्यतः समाजापासून वेगळं मानलं जातं, मात्र काही अघोरी साधू समाजसेवेत महत्त्वाची भूमिका बजावतात. कुष्ठरोग्यांसाठी रुग्णालयं उभारणं, समाजाने तिरस्कृत मानलेल्या लोकांना मदत करणं यांसारख्या कार्यात अघोरी सक्रिय असतात. त्यांचा दृष्टीकोन असा असतो की, प्रत्येक व्यक्तीला आणि वस्तूला स्वीकारण्याचं सामर्थ्य विकसित झालं पाहिजे.
समज-गैरसमज आणि वास्तव
अघोरी साधूंविषयी अनेक चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्या आहेत. काही जण स्वतःला अघोरी म्हणवून घेतात, पण त्यांचं वर्तन आणि साधना खऱ्या अघोरी संप्रदायाशी संबंधित नसतात. खऱ्या अघोरी साधूंना कोणत्याही प्रकारचा दिखावा नको असतो आणि ते लोकांकडून पैसे किंवा अन्न स्विकारत नाहीत.
आधुनिक काळातील अघोरी
आजच्या काळात काही अघोरी साधूंनी आधुनिक सुविधांचा स्वीकार केला आहे. काही अघोरी मोबाईल फोनचा वापर करतात किंवा प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक वापरतात. यामुळे पारंपरिक अघोरी संप्रदाय आणि आधुनिक जीवनशैली यांच्यातील तफावत स्पष्ट होते.
अघोरींचा संदेश
अघोरी पंथाचा उद्देश मानवी मनातील द्वेष, घृणा आणि भय यांवर मात करणे हा आहे. मृत्यू आणि नश्वरतेचा स्वीकार करून त्यांनी जीवनाचं गहन तत्त्वज्ञान शोधलं आहे.अघोरी संप्रदाय हा फक्त गूढतेचं प्रतीक नसून, मानवतेच्या उच्चतम रूपाचा शोध घेण्यासाठीची एक आध्यात्मिक वाटचाल आहे. समाजाला त्यांच्या जीवनशैलीचं महत्त्व समजून घेतलं तर त्यांच्यातील मानवीयता उलगडू शकते.