शात संविधान दिन एकीकडे साजरा होत असताना दुसरीकडे नेमके त्याच दिवशी चेन्नईतील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. उत्तरकाशी येथे अडकलेल्या मजुरांच्या सुटकेचे प्रयत्न आणि महाराष्ट्रात गारपीट आणि अवकाळी पावसाने मांडलेला उच्छाद यामुळे व्ही पींच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभाकडे काहीसे दुर्लक्ष झाले. हिंदी भाषक नेत्यांबाबत दक्षिणेकडील राज्यांचा असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर या पुतळ्याच्या अनावरणाकडे आणि या समारंभातील अखिलेश यादव यांच्या उपस्थितीकडे पाहावे लागेल.
या कार्यक्रमाने देशात काही वेगळी राजकीय समीकरणे आकाराला येतात, की काय अशी शंका यायला लागली आहे. देशभर ओबीसींच्या कथित आरक्षणाला असलेला धोका, काँग्रेसने लावून धरलेला जातीच्या गणनेचा मुद्दा, बिहारमध्ये झालेले जातीचे सर्वेक्षण आणि त्यावरचे राजकारण या पार्श्वभूमीवर संसदेच्या आगामी अधिवेशनात सरकार आणीत असलेली विधेयके पाहता दक्षिणेत घडलेला कार्यक्रम वेगळा संदेश देत आहे.
राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात सरंक्षणमंत्री असताना ज्या व्ही. पी. सिंह यांनी भाजपच्या मदतीने बोफोर्स गैरव्यवहाराचा कथित मुद्दा बाहेर काढला, राजीव यांच्या विरोधात जाऊन भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले, मंडल आयोगाचा अहवाल बाहेर काढून कमंडलला उत्तर दिले. त्याच सिंह यांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले. या पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळी स्टॅलिन यांनी व्ही. पी. सिंह यांना मागासवर्गीयांचे नायक म्हटले; परंतु त्याच वर्गातील ‘इंडिया’ आघाडीच्या इतर नेत्यांना, विशेषत: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले नाही. यातून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्माला केलेल्या विरोधामुळे ‘इंडिया’ आघाडीत काहीशी दरी निर्माण झाली होती.
उदयनिधी यांच्याविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेकांनी सूर आळवला होता. लोकसभेच्या निवडणुकीसाठी ‘इंडिया’ आघाडी एकत्र येण्यासाठी बैठकांमागून बैठका झाल्या. भाजपशी एकास एक लढत देण्याची भाषा झाली; परंतु पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि आम आदमी पक्षासाठी जागा सोडायला नकार दिल्यामुळे ‘इंडिया’ आघाडीत दरी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अखिलेश यांनी तमिळनाडूतील कार्यक्रमांना हजेरी लावल्यामुळे बिगर काँग्रेस तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
सिंह यांच्या प्रयागराज या जिल्ह्याबाहेर सिंह यांचा पहिला पुतळा का बसवण्यात आला, याची चिकित्सा सुरू झाली आहे. ८० च्या दशकात लागू करण्यात आलेल्या बी. पी. मंडल आयोगाच्या शिफारशी आणि त्या वेळची राजकीय परिस्थिती यात त्याचे उत्तर आहे. त्या वेळच्या सत्ताधारी काँग्रेसने या शिफारशी दहा वर्षे दाबून ठेवल्या. २ डिसेंबर १९८९ रोजी राष्ट्रीय आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि सिंह पंतप्रधान झाले. सिंह यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या. त्यात इतर मागासवर्गीयांना केंद्रीय नोकऱ्यांमध्ये २७ टक्के आरक्षण मिळाले. स्टॅलिन यांनी पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी याचा उल्लेख केला. मंडल आयोगाच्या शिफारशी राज्यात लागू केल्याबद्दल त्यांना सामाजिक न्यायाचा नायक म्हणून सिंह यांचा सन्मान करायचा आहे.
‘इंडिया’ आघाडीची स्थापना झाली, तेव्हा अखिलेश आणि स्टॅलिन हे त्याचे महत्त्वाचे भाग बनले; परंतु मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जागावाटपात समाजवादी पक्षाकडे दुर्लक्ष केले आणि दोन्ही बाजूंनी जोरदार विधाने केली गेली. अखिलेश यांनी ‘इंडिया’ आघाडीवर प्रश्न उपस्थित केले. ते अलीकडेच तेलंगणात के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीसाठी प्रचाराला गेले होते. स्टॅलिन यांना वाटत असेल, की अखिलेश यांच्या माध्यमातून ते उत्तर प्रदेशातील मागासवर्गीय आणि बिहारमधील राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दल यांना एकत्र आणू शकतात. तिसरी आघाडी मजबूत करण्यासाठी हे आवश्यक असेल.
अखिलेश यांचे वडील मुलायमसिंह आणि स्टॅलिन यांचे वडील करुणानिधी यांच्यातील सलोख्याचे संबंध सर्वांनाच माहीत आहेत. स्टॅलिन यांनी बिहारचे मुख्यमंत्री आणि मागासवर्गीय नेते नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांना निमंत्रित न केल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. यादव यांनी अलीकडेच बिहारमधील जातीय जनगणनेचे आकडे सार्वजनिक केले. काँग्रेसचे राहुल गांधीही मागासवर्गीयांच्या प्रश्नांवर सातत्याने वक्तव्ये करत आहेत. स्टॅलिन यांनी यापैकी कुणालाही निमंत्रित केले नाही. स्टॅलिन या नेत्यांशिवाय तिसरी आघाडी स्थापन करण्याचा विचार करत असल्याचे मानले जात आहे. या आघाडीत स्टॅलिन यांना अखिलेश, अरविंद केजरीवाल, केसीआर, जगन मोहन रेड्डी आणि तेजस्वी यादव तसेच डाव्यांचा पाठिंबा मिळू शकतो. ‘इंडिया’ आघाडी मोडल्यास भक्कम पर्याय असला पाहिजे, असे त्यांचे मत आहे. त्यासाठीची तयारी जोरात सुरू आहे.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई हल्ल्याच्या दिवशी सिंह यांचे निधन झाले. राजकीय पक्षांनी या दिवशी कोणताही कार्यक्रम आयोजित केला नाही. सिंह यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी आयोजित सभेला संबोधित करताना स्टॅलिन यांनी देशव्यापी जात जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला. सिंह यांची मागासलेल्या लोकांचा मसिहा म्हणून ओळख आहे. स्टॅलिन यांना तामिळनाडूत सामाजिक न्यायाचे नायक म्हणून त्यांना सन्मानित करायचे आहे. स्टॅलिन यांनी त्यांचे वडील, माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या पुतळ्याचे राज्यात अनावरण केले, तेव्हा त्यांनी देशभरातील नेत्यांना आमंत्रित केले होते.
आता स्टॅलिन ‘इंडिया आघाडी’चे सदस्य असताना त्यांनी आघाडीच्या नेत्यांना बोलावायला हवे होते; पण असे झाले नाही, अखिलेश यादव यांना आमंत्रण दिल्यामुळे स्टॅलिन हे राष्ट्रीय राजकीय दृश्यात द्रमुकसाठी मोठी भूमिका शोधत असल्याची अटकळ बांधण्यात आली. द्रमुकने देशभरातील १९ विरोधी नेत्यांसह राष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे आयोजन केल्यानंतर काही आठवड्यांनंतर ही घोषणा झाली.
अखिलेश यादव यांचा ‘इंडिया’ आघाडीबाबत भ्रमनिरास झाला आहे. अखिलेश गेल्या अनेक दिवसांपासून बिगरकाँग्रेस तिसरी आघाडी स्थापन करण्याचा विचार करत आहेत. स्टॅलिन राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका बजावण्याचा विचार करू शकतात. द्रमुकला निवडणुकीनंतरच्या परिस्थितीवर प्रभाव टाकायचा आहे. ‘इंडिया’ आघाडीबाबत काही अडचण निर्माण झाली, तर तिसऱ्या आघाडीसाठी दरवाजे उघडले जाऊ शकतात. अखिलेश यांच्याकडे राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दल यांच्यासोबत ‘तिसऱ्या आघाडी’चे कार्ड अ सल्याने त्यांनी अखिलेश यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते.
अखिलेश हे राष्ट्रीय स्तरावर ओबीसी नेते आहेत. काही महिन्यांपूर्वी अखिलेश म्हणाले होते, की समाजवादी पक्ष हा उत्तर भारताचा द्रमुक आहे. कदाचित त्यामुळेच माजी पंतप्रधानांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी अखिलेश हे देशातील सर्वात योग्य व्यक्ती आहेत, असे स्टॅलिन यांना वाटले असावे. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. सिंह हे मागासलेल्या समाजातील नव्हते किंवा ते गरीब कुटुंबातील नव्हते; परंतु त्यांनी गरीब, वंचित आणि पीडितांच्या आरक्षणासाठी लढा दिला. त्यांच्या पुतळ्याचे अनावरण हे वेगळ्या राजकीय समीकरणाची नांदी मानली जाते.