Take a fresh look at your lifestyle.

तुमचाही शेत रस्ता अडवलाय का? तर आजचा लेख खास तुमच्यासाठी- वाचा कायदेशीर उपयुक्त माहिती…

कधी भावकीच्या वादामुळे तर कधी शेजारील जमीन मालकाच्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे शेतात जाण्यासाठीचा पूर्वापार चालत आलेला शेत रस्ता अडवला किंवा पूर्णपणे बंद केला अशा बाबी सातत्याने आपल्या आजुबाजुला घडत असतात. यामुळे उद्भवणारे वाद हे फक्त बोलाचाली पुरतेच मर्यादित राहत नाही तर अशा रस्त्यांच्या वादातून आजवर कित्येक वाद अगदी विकोपाला जाऊन मारामाऱ्या, खून अश्या घटनाही घडल्या आहेत. कदाचित अश्या घटनांचे तुम्ही पीडित किंवा साक्षीदार असाल. परंतु शेत रस्त्यांच्या प्रश्नावर आमनेसामने तू तू मे मे करून भांडत बसण्यापेक्षा कायद्यातील तरतुदींचा आधार घेत आपण हे वाद शांततेत मिटवू शकतो ते कसे हे जाणून घेण्यासाठी लेख पूर्ण वाचा.

तुमच्या शेतात जाण्यासाठी असणारी पायवाट किंवा बैल गाडी रस्ता जो पूर्वीपासून अस्तित्वात होता ज्याची शासन दरबारी नोंद नाही असा रस्ता अडवला किंवा आपल्याला अश्या रस्त्यावरून येण्याजाण्यास अडथळा निर्माण केल्यास सर्वप्रथम मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम पाच प्रमाणे आपल्या भागातील तहसीलदारांसमोर पूर्वापार वहिवाटीचा रस्ता खुला करावा यासाठी अर्ज सादर करावा. सदरच्या अर्जात सर्व बाबी स्थळाचे वर्णन पूर्वापार चालत आलेल्या रस्त्याचे वर्णन तसेच इतर महत्त्वाचा वाटणाऱ्या सर्व बाबी व्यवस्थित सविस्तर नमूद कराव्यात. सदरचा अर्ज तयार करताना शक्यतो वकिलाची मदत घ्यावी.जेणेकरून आपल्या अर्जात काही त्रुटी राहणार नाहीत, कारण सुरुवातीला सादर केलेला अर्ज हा अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत असतो.

मामलेदार कोर्ट कायदा कलम 5 अन्वये तहसीलदारांना पूर्वापार वहिवाटींच्या शेत रस्त्यांचे वाद मिटवण्यासंदर्भाने काही अधिकार देण्यात आले आहेत. तहसीलदार आपल्या अधिकाराचा वापर करत जर शेतकऱ्याने अर्ज करत हे सिद्ध केलं की त्याच्या शेतातील किंवा शेतात जाण्यासाठीचा पूर्वापार वहिवाटीचा शेत रस्ता किंवा बैलगाडी रस्ता बाजूच्या शेतकऱ्याने अथवा गटातील शेतकऱ्यांनी अडवला किंवा बंद केला आहे तर तहसीलदार सदरच्या स्थळाचे प्रत्यक्ष निरीक्षण करून पंचनामा करून त्यावर सुनावणी घेऊन दोन्ही बाजूच्या अर्जदार व सामने वाला यांचे म्हणणे ऐकून घेऊन व सादर केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करून योग्य तो निर्णय पारित करतात. जर अर्जदार सदरचा अडवला गेलेला रस्ता हा पूर्वापार वहिवाटीचा रस्ता असल्याचे सिद्ध करू शकला तर सदरचा रस्ता खुला करण्याबाबतचा आदेश पारित केला जातो. परंतु अर्जदार हा सदरचा अडवला गेलेला रस्ता किंवा बंद केलेला रस्ता हा पूर्वपार वहिवाटीचा रस्ता असल्याचे सिद्ध करण्यात अयशस्वी ठरला तर सदरचा निर्णय हा अर्जदाराच्या विरोधात देखील जाऊ शकतो.

यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अशा प्रकारे जर आपल्या रस्त्याची अडवणूक झाली किंवा अडथळा निर्माण झाला तर किती दिवसांच्या आत सदरचा वाद अर्जाद्वारे तहसीलदार साहेबांसमोर मांडायला हवा? तर शक्यतो सहा महिन्यांचा आत हा वाद तहसीलदार साहेबांचा समोर कलम पाच अन्वये मांडायला हवा. बऱ्याचदा काही प्रकरणांमध्ये उशीर झाल्यामुळे पूर्वापार वहिवाटीच्या रस्त्यांच्या खुणा या पूर्णपणे पुसून गेलेले असतात त्यामुळे देखील आपण सदरचा रस्ता हा पूर्वापार वहिवाटीचा होता हे सिद्ध करण्यात अयशस्वी ठरू शकतो.त्यामुळे जेव्हा आपल्या लक्षात येईल की सदरचे प्रकरण बोलाचालीतून सामंजस्याच्या भूमिकेतून मिटणारे नाही, तेव्हा मागचा पुढचा कोणताही विचार न करता आपण सरळ कायदेशीर मार्गाचा अवलंब करत योग्य त्या वकिलांचा सल्ला घेऊन मामलेदार कोर्ट अॅक्ट कलम पाच अन्वये अर्ज सादर करून न्याय मागण्यास हरकत नाही.

काही प्रकरणांमध्ये पूर्वापार वहिवाटीचा रस्ता तर पूर्णतः नष्ट केलेला असतो त्याचा खुणा खाना देखील दिसत नसतात अशावेळी याच ठिकाणाहून पूर्वापार वहिवाटीचा रस्ता होता हे सिद्ध करणं थोडं कठीण जातं परंतु अशा प्रकरणांमध्ये आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे जबाब तसेच खरेदी खतांमध्ये पूर्वापार वहिवाटीच्या रस्त्यांचा उल्लेख असतो सदरचा खरेदी खतांच्या प्रती व आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा जबाब कागदोपत्री आपण सदरच्या अर्जासोबत जोडून देऊ शकतो.

सदरच्या प्रकरणांमध्ये कागदोपत्री पुराव्यांबरोबरच स्थळ निरीक्षण पंचनामा देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत असतो. स्थळ निरीक्षण पंचनामा हा घटनास्थळावर अधिकारी व पंच स्वतः उपस्थित राहून सद्यस्थिती जाणून घेऊन आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे जबाब घेऊन तयार करत असतात. स्थळ निरीक्षण पंचनामा हा दोन्ही बाजूच्या म्हणजेच अर्जदार व सामने वाला यांच्या उपस्थितीतच केला जातो. सदर पंचनाम्यावेळी जे काही आढळते तर सर्व बाबी पंचनाम्यामध्ये नमूद केलेल्या असतात. हा पंचनामा लिखित स्वरूपाचा असतो. सदरच्या पंचनाम्यावर उपस्थित पंच अधिकारी तसेच अर्जदार व सामने वाला यांच्या देखील सह्या असतात.

त्यानंतर सदरच्या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद होऊन प्रकरण निकाली काढले जाते. परंतु प्रकरण निकाली काढण्यापूर्वी स्थळ निरीक्षण पंचनामा बाबत आपल्याला काही तक्रार असल्यास व तो पंचनामा मान्य नसल्यास त्याबाबत आपण आपले म्हणणे सादर करू शकतो. सदरच्या पंचनाम्यावर आपण आक्षेप नोंदवू शकतो सदरच्या आक्षेपावर योग्य ती सुनावणी होते. अशाप्रकारे आपल्या शेत रस्त्याचा प्रश्न आपण मिटवू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.